नांदेडच्या अर्धापूरमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

नांदेड जिल्हा मधील अर्धापूर तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवला आहे. काढणीस आलेली ज्वारी अक्षरशः भुईसपाट झाली असून गहू, केळी, हळद आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अर्धापूर तालुक्यातील सोनाळा, चाभरा, चाभरा तांडा, खैरगाव, लिमगाव आणि रोडगी या भागांमध्ये काल सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक गारपीट आणि वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे शेतात काढणीस तयार असलेली ज्वारी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे.
तसेच गहू, केळी, हळद आणि विविध फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनतीने उभा केलेला पीक काही मिनिटांतच उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर सर्व परिश्रम वाया गेले आहेत.
या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कर्जाचा डोंगर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरवर्षी अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असतानाही योग्य मदत मिळत नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.
अर्धापूर तालुक्यातील या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आता प्रशासन किती लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



