BuldhanaLatest News

मेहकरमध्ये भीषण आगीचा थरार! हॉस्पिटलशेजारील डीपी पेटली; नागरिकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

मेहकर (बुलढाणा): मेहकर शहरातील पाखरे हॉस्पिटलच्या परिसरात आज दुपारी अचानक डीपीला भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारी उभ्या असलेल्या वाहनांना आणि हॉस्पिटलला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

डीपीतून डिझेल लिकेज अन् आगीचे गोळे

पाखरे हॉस्पिटलच्या अगदी शेजारी असलेल्या वीज वितरण कंपनीच्या (MSEB) डीपीमध्ये अचानक बिघाड होऊन आग लागली. डीपीमधून ऑईल (डिझेल) गळत असल्याने आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. या डीपीच्या जवळच एक कार आणि एक लोडिंग वाहन उभे होते, जे सुदैवाने या आगीतून थोडक्यात वाचले.

MSEB चा हलगर्जीपणा, नागरिकांचा पुढाकार

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी वीज वितरण कंपनीला कळवले, परंतु कर्मचारी वेळेवर न पोहोचल्याने संताप व्यक्त करण्यात आला. शेवटी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी पाखरे हॉस्पिटलमधील अग्निशमन सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ आग आटोक्यात येत नव्हती, अखेर वीज कर्मचारी पोहोचले आणि वीजपुरवठा खंडित करून आग पूर्णपणे विझवण्यात आली.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

हॉस्पिटलसारख्या संवेदनशील परिसरातील डीपीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

गजानन राऊत, मेहकर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button