‘तमिळविरोधी बोलाल तर…’; मुंबईत ठाकरे बंधूंना खुलं चॅलेंज! भाजप आमदाराचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मुंबई कुणाची?’ या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता थेट तमिळ विरुद्ध ठाकरे असा वळण घेताना दिसत आहे. भाजपचे स्टार प्रचारक के. अण्णामलई यांच्या ‘मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर’ असल्याच्या विधानाचा समाचार घेणाऱ्या ठाकरे बंधूंना, आता भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी नाव न घेता खुलं आव्हान दिलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई मनपा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलई यांनी मुंबईच्या अस्तित्वाबाबत विधान केलं होतं. या विधानानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. विशेषतः राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून तमिळ नेत्यांच्या हस्तक्षेपावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. याच टीकेला आता सणसणीत उत्तर देण्यात आलं आहे.
मुरुगन मंदिराच्या रॅलीतून शक्तीप्रदर्शन
सायन कोळीवाडा येथे भगवान मुरुगन यांच्या ‘थैपूसम’ उत्सवानिमित्त भव्य ‘पाळकुडम कावडी अट्टम’ रॅली काढण्यात आली होती. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत हजारो तमिळ बांधव सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच करण्यात आले.
“एक लाख तमिळ बांधवांची रॅली काढणार”
यावेळी बोलताना तमिळ सेल्वन यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख ‘एक मोठा नेता’ असा करत त्यांना इशारा दिला. सेल्वन म्हणाले:
“काही दिवसांपूर्वी एक मोठा नेता तमिळ बांधवांच्या विरोधात बोलला होता. आम्हाला कोणीही वाईट बोलू नका, ही रॅली त्याचीच झलक आहे. येणाऱ्या एका महिन्यात आम्ही मुंबईत एक लाख तमिळ बांधवांची यापेक्षाही मोठी रॅली काढू.”
ठाकरे बंधू काय भूमिका घेणार?
निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या ठाकरे बंधूंना आता थेट तमिळ कार्ड खेळून आव्हान देण्यात आलं आहे. अण्णामलईंच्या विधानानंतर सुरू झालेला हा ठिणगीचा वाद आता सेल्वन यांच्या इशाऱ्याने वणवा बनण्याची शक्यता आहे. या आव्हानाला राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आपल्या शैलीत काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.



