मेरा युवा भारततर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

अमरावती, दि. 31 (जिमाका)
मेरा युवा भारत व नांदगाव खंडेश्वर येथील जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव खंडेश्वर येथे तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र जेवडे, तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष मोहन जाधव, शीतल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, 100 मीटर मुलांची धावणे, 100 मीटर मुलींची धावणे तसेच गोळाफेक आदी खेळांचा समावेश होता. सांघिक स्पर्धांतील विजेता संघांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. तसेच वैयक्तिक खेळांतील विजेत्या खेळाडूंनाही प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांना मेरा युवा भारत अमरावती, युवा कार्यक्रम विभाग, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.
या क्रीडा स्पर्धांचे आयोजन मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जनस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



