धक्कादायक प्रकार! IT मॅनेजर तरुणीवर CEOसह महिला अधिकाऱ्याचा गाडीत अत्याचार; घटना डॅशकॅममध्ये कैद

आयटी क्षेत्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका आयटी कंपनीतील तरुण महिला मॅनेजरवर कंपनीचा CEO, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीने मिळून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार पीडितेच्या कारमधील डॅशकॅममध्ये कैद झाल्याने खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे १.१५ वाजताच्या सुमारास पीडितेला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्याच कारमध्ये बसवण्यात आले. कार महिला कार्यकारी प्रमुखाचा पती गौरव सिरोही चालवत होता, तर कंपनीचा CEO जितेश प्रकाश सिसोदिया मागील सीटवर बसला होता. प्रवासादरम्यान सिगारेट ओढल्यानंतर पीडिता बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपींनी सुमारे साडेतीन तास तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
डॅशकॅम ठरला महत्त्वाचा पुरावा
दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडितेला तिच्या शरीरावर जखमा, कपड्यांची अस्ताव्यस्त अवस्था तसेच काही दागिने गायब असल्याचे आढळले. संशय बळावल्याने तिने आपल्या कारमधील डॅशकॅमचा ऑडिओ आणि व्हिडिओ तपासला. डॅशकॅममध्ये संपूर्ण घटना कैद झाल्याचे दिसून आले. केवळ अत्याचाराचे दृश्यच नव्हे, तर आरोपींमधील संभाषणही रेकॉर्ड झाले असून, हे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत.
पोलिसांची तात्काळ कारवाई
पीडितेच्या तक्रारीनंतर आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत CEO जितेश प्रकाश सिसोदिया, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिचा पती गौरव सिरोही यांना अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या शरीरावर आणि गुप्तांगांवर गंभीर जखमा आढळून आल्याने सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक योगेश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, सखोल चौकशीसाठी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींची माहिती
मुख्य आरोपी जितेश सिसोदिया हा उदयपूरमधील आलिशान ‘स्काय मरीना’ अपार्टमेंट संकुलात राहतो आणि एका मोठ्या आयटी कंपनीचा CEO आहे. या घटनेनंतर आयटी क्षेत्रात आणि शहरात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.



