Latest NewsMaharashtrapolitics

महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? महाविकास आघाडीनंतर आता महायुतीत ताण वाढला

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चिन्हं दिसत आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीतही तणाव वाढल्याचं चित्र आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून मतभेद उफाळून येत असतानाच, दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकताच रात्री उशिरा अजित पवार यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. दोन्ही पक्षांतील महत्त्वाच्या नेत्यांची लवकरच भेट होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडणूक लढण्यास अनुकूल असल्याचं बोललं जात असून, शिवसेनेला ४० ते ४५ जागा देण्यासही ते तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावरून अद्याप अंतिम तोडगा न निघाल्याने महायुती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मुंबईत २०७ जागांवर भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये भाजपला १२८ तर शिवसेनेला ७९ जागांवर सहमती झाल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित २० जागांबाबत चर्चा सुरू असून, सर्व मित्रपक्षांना समाधानकारक जागा दिल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या जागावाटपावर रंगशारदा सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सांगण्यात आलं.

दुसरीकडे, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मुंबईत राष्ट्रवादी सुमारे ५० जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे सोपवण्यात आल्याने भाजप आणि शिवसेनेकडून त्याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मुंबईत महायुतीपासून वेगळं होत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत आणखी एक नवं राजकीय समीकरण समोर आलं आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नव्या आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुंबईतील २२७ जागांपैकी वंचित बहुजन विकास आघाडी ६२ जागा लढवणार असून, उर्वरित जागांवर काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

एकूणच, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button