रक्त, कर्करोग, डोळे, लिव्हर-किडनी चाचण्या मोफत

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात आरोग्यदायी समाजाच्या संकल्पनेतून केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आणि एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. मेहकर ग्रामीण रुग्णालयात आयोजित या शिबिरात तब्बल १४ प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. रक्तदान तपासणी, मधुमेह तपासणी, मुख व गर्भाशय तपासणी, कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी आणि त्वरित चष्मा वितरण, किडनी व लिव्हर फंक्शन टेस्ट यांसह विविध महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या.
सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात हजारो नागरिकांनी आपल्या कुटुंबासह सहभाग घेतला. या शिबिरात निदानाबरोबरच त्वरित उपचाराची साधने देखील उपलब्ध करून देण्यात आली. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकासाठी ही सेवा उपलब्ध करून दिल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. यामुळे मेहकर तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी संपूर्ण आरोग्य तपासणीची संधी मिळाली.
शिबिरात पीएचसी सेंटर, एचएचसी सेंटर यांसारख्या ठिकाणीही सेवा देण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला व या संकल्पनेचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबासह आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.



