IND vs UAE, Asia Cup 2025: दुबईत भारत-यूएई आमनेसामना; पावसाचा त्रास नाही, जाणून घ्या पिच आणि हवामानाचा अंदाज

दुबई : आशिया कप 2025 मध्ये आजचा सामना टीम इंडिया आणि यजमान युनायटेड अरब एमिराट्स (UAE) यांच्यात दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री 8 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे.
भारत हा गतविजेता संघ असून यंदाही जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे, UAE संघासाठी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवणे हीच एक मोठी उपलब्धी ठरणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असून, यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीम आहे.
दुबई पिच रिपोर्ट: फिरकी आणि सीमर दोघांनाही संधी
दुबईचं पिच पारंपरिकपणे धीम्या गतीचं ओळखलं जातं. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि बाऊन्स मिळतो, तर नंतरच्या षटकांमध्ये फिरकीपटूंना मोठी भूमिका बजावता येते. आकडेवारीनुसार येथे मिळालेल्या एकूण विकेट्सपैकी 64% विकेट्स सीमर गोलंदाजांनी घेतल्या आहेत.
या मैदानावर सरासरी धावसंख्या 144 इतकी आहे, आणि मागील 10 सामन्यांपैकी 8 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून फलंदाजी करणं फायदेशीर ठरू शकतं.
हवामान अंदाज: पावसाचा अडथळा नाही
प्रेक्षकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे दुबईतील हवामान सामना खेळण्यासाठी अनुकूल आहे. सामन्यावेळी पावसाची शक्यता शून्य टक्के आहे. तापमान सायंकाळी 37 अंश सेल्सिअस असणार असून रात्री 9 वाजेपर्यंत ते 35 अंशांवर येईल. आर्द्रता सुमारे 51% असेल. मात्र हवेची गुणवत्ता ‘अनहेल्दी’ असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. खेळात मात्र पावसाचा कोणताही अडथळा येणार नाही.
🇮🇳 भारतीय संघ (Team India):
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंह.
🇦🇪 यूएई संघ (UAE Team):
मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, अर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पाराशर, एथन डिसूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद जोहैब, राहुल चोपडा, रोहिद खान, सिमरनजीत सिंह, सगीर खान.



