साफसफाई व अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आढावा – आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची बेलपुरा रोड, कंवर नगर, अंबिका नगर व राजापेठ परिसरात पाहणी
अमरावती : आज दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी ७.३० वाजता बेलपुरा रोड, कंवर नगर, अंबिका नगर व राजापेठ या परिसरात स्वच्छता व अतिक्रमण संदर्भातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्वच्छता बाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच, अनधिकृत अतिक्रमण झोनमध्ये येणाऱ्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काही ठिकाणी अनधिकृत टपऱ्या व बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले असून, येत्या काही दिवसांत नियोजित कारवाई करण्यात येणार आहे.
ही पाहणी मोहीम महानगरातील नागरी सुविधा, स्वच्छता व वाहतुकीचा सुलभ प्रवाह सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. यावेळी आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सदर परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. नियमित साफसफाई सुनिश्चित करावी. कचरा उचलण्यासाठी पुरेशा संख्येने वाहनांची आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. अनधिकृत अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा. मुख्य रस्ते व सार्वजनिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. अतिक्रमण करणा-यांना पूर्वसूचना देऊन नंतर तातडीने कारवाई करावी. नागरिकांना जनजागृतीद्वारे सहभागी करून घ्या. स्वच्छतेबाबत जनजागृती मोहिमा चालवा. स्थानिक रहिवाशांना अडचणी असल्यास त्यांची माहिती घेऊन तत्काळ उपाय सुचवावेत. दंडात्मक कारवाईला गती द्या. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंड लावण्यात यावा. नियमित गस्तीद्वारे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कामगिरीसाठी उत्तरदायी धरण्यात येईल. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल. यावेळी भुयारी गटारीचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांना देण्यात आले. सदर परिसरातील नालीचे बांधकामांबाबत व नाल्यांचे नियमित देखरेख करण्याचे निर्देश यावेळी अभियंत्यांना देण्यात आले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, “अमरावती शहर हे स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, या कार्यात प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाचीही सक्रिय भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपापल्या परिसरात स्वच्छता राखावी, कचरा निर्धारित ठिकाणीच टाकावा आणि अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण टाळावे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. जर आपल्या परिसरात कुठे अतिक्रमण, घाणीची स्थिती किंवा महापालिकेच्या सेवांबाबत अडचणी असतील, तर महापालिकेशी त्वरित संपर्क साधावा. ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे.
या पाहणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते



