Crime NewsNagpur

मद्यधुंद तरुणाचा दारूच्या नशेत कारने कहर; संतप्त ग्रामस्थांनी चोप दिला

रामटेक: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका मद्यधुंद तरुणाने दारूच्या नशेत कार चालवून 25 ते 30 लोकांना कट मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पाठलाग करून या तरुणाला चांगलाच चोप दिला, त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही घटना 3 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वाजता रामटेक तालुक्यातील नगरधन येथे घडली. हर्षपाल महादेव वाघमारे (वय 40, रा. हमलापुरी) असे या तरुणाचे नाव असून, तो भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे आणि काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी आला होता.

घटनेच्या दिवशी हर्षपाल दारू पिऊन आपल्या आय टेन (i10) कारने नगरधन येथील साई मंदिर, दुर्गा चौक मार्गे हमलापुरीकडे जात होता. दारूच्या नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गावातील 25 ते 30 लोकांना कट मारल्या. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यानंतर हर्षपालने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हमलापुरी रोडवरील हनुमान मंदिरासमोर त्याची कार एका झाडाला धडकून नाल्यात पडली. संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील हर्षपालला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button