तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांचा १३ किमी पायी एल्गार

फत्तेपूर ते तिवसा तहसील कार्यालय पदयात्रा; दुष्काळ, सिंचन, वीज, पीकविमा आणि हमीभावासाठी शेतकरी आक्रमक
तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जोरदार एल्गार पाहायला मिळाला. तब्बल १३ किलोमीटर पायी चालत शेतकऱ्यांनी फत्तेपूर ते तिवसा तहसील कार्यालय असा प्रवास करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पायी शेतकरी, सोबत ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांचा ताफा… त्यामुळे या पदयात्रेला मोठ्या आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले.

शिवणगाव-फत्तेपूर परिसरातून सुरू झालेली ही पदयात्रा तिवसा तहसील कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली. अत्यल्प पाऊस, पिकांचे नुकसान, सिंचनाचा प्रश्न, शेतीच्या वीजपुरवठ्यातील अडचणी, पीकविमा आणि शेतमालाला योग्य भाव अशा विविध प्रश्नांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले.
माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख आणि प्रहारचे जिल्हाप्रमुख योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गुरुकुंज मोझरी येथे पदयात्रा पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. त्यानंतर पुन्हा पदयात्रा तिवसा तहसील कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली.
यावेळी तिवसा तालुका आणि अमरावती जिल्हा कोरड्या दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कोरडवाहू भागात पोहोचवावे आणि शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय स्मार्ट मीटरचे काम थांबवावे, शेतीच्या वीज समस्या तातडीने सोडवाव्यात, पीकविम्याचे जाचक निकष रद्द करावेत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.
१३ किलोमीटरचा पायी प्रवास करत तहसील कार्यालयावर धडक देणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत प्रशासनाला सादर केले. आता शासन या मागण्यांची किती गांभीर्याने दखल घेते आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कधी दिलासा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



