AmravatiBadneraNewscitynewsFestival News

बडनेऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे जल्लोषात आगमन

फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह; पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मिरवणुका शांततेत

बडनेरा शहरात विघ्नहर्त्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात आगमन झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने नवी वस्ती परिसरासह संपूर्ण बडनेरा शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले.

शहरातील विविध गणेश मंडळांनी पूर्वनियोजित मार्गावरून श्रींच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढली. आकर्षक सजावट केलेली वाहने, ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. महिला, युवक, लहान मुलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत लाडक्या बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत केले.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत ऊरलागोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे गणेश मंडळांच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या.

बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण आणि शहरी भागात एकूण ९० नोंदणीकृत गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी १० ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात पोलिसांना यश आले आहे.


गणरायाच्या आगमनाने बडनेरा शहरातील गणेशोत्सवाला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, आगामी दिवसांत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी हा उत्सव आणखी रंगणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button