citynewsCrime NewsNagpurNagpurCrimeNewsNagpurPolice

नागपुरात मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

सीताबर्डीतील सेकंड फ्लोअर कॅफेवर कारवाई; २३ ग्राहक हुक्का ओढताना आढळले, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपुरात मध्यरात्री सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सीताबर्डी परिसरातील सेकंड फ्लोअर कॅफेवर एनडीपीएस पथक आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ने संयुक्त धाड टाकली. या कारवाईदरम्यान तब्बल २३ ग्राहक हुक्का ओढताना आढळून आले, तर मोठ्या प्रमाणात हुक्का पॉट आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य फ्लेवर जप्त करण्यात आले आहेत.

१५ सप्टेंबरच्या पहाटे साडेबारा ते दोन वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी भुवन चौकातील गोतमारे कॉम्प्लेक्समध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, हुक्का पार्लरच्या मालकाने बाहेरून दरवाजाला कुलूप लावून पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांसमक्ष कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता, २३ ग्राहकांना हुक्का दिला जात असल्याचे आढळून आले.

या कारवाईत १९ हुक्का पॉट, १० नळ्या, २० चिलम, प्रतिबंधित तंबाखूचे फ्लेवर, दोन एलईडी टीव्ही, सोफा, रेफ्रिजरेटर आणि डीव्हीआर, असा एकूण तब्बल २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पार्लरच्या मालकासह इतर आरोपी आणि ग्राहकांविरुद्ध कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मध्यरात्री नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागपुरातील अवैध हुक्का व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात पुढील तपासात आणखी काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button