citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात तान्हा पोळ्याची रंगत शिगेला! ८ लाखांचा भव्य नंदीबैल बाजारात

लकडगंजच्या लकडा बाजारात लाकडी नंदीबैलांची मोठी उलाढाल; नागपूरच्या २३७ वर्षांच्या परंपरेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : नागपुरात तान्हा पोळ्याची रंगत आता शिगेला पोहोचली आहे. लकडगंज परिसरातील लकडा बाजारात लाकडी नंदीबैलांचा भव्य बाजार सजला असून, विविध आकारांचे आणि आकर्षक कलाकुसर केलेले नंदीबैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, यंदा या बाजारात तब्बल ८ लाख रुपयांपर्यंतचा नंदीबैल विक्रीसाठी उपलब्ध आहे. नागपूरच्या तान्हा पोळ्याच्या या ऐतिहासिक परंपरेला यंदा तब्बल २३७ वर्षे पूर्ण होत आहेत.

शेतकऱ्याचा विश्वासू साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा केला जातो. लहान मुलांना बैलांचे महत्त्व आणि शेतीतील त्यांच्या योगदानाची जाणीव व्हावी, या उद्देशाने सुरू झालेली ही परंपरा आजही नागपूरकर मोठ्या उत्साहाने जपत आहेत.

तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर लकडगंजच्या लकडा बाजारात लाकडी नंदीबैलांची मोठी आवक झाली आहे. सहा इंचांच्या छोट्या नंदीबैलांपासून ते तब्बल सात ते आठ फूट उंचीच्या भव्य नंदीबैलांपर्यंत विविध आकार बाजारात पाहायला मिळत आहेत. आकर्षक रंगसंगती, पारंपरिक रूप आणि बारीक कलाकुसर यामुळे हे नंदीबैल नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.

या नंदीबैलांच्या किंमती शंभर रुपयांपासून सुरू होऊन थेट लाखो रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, यंदाच्या बाजारातील सर्वात मोठे आकर्षण ठरला आहे तो वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील कारागीर रवींद्र मुकादम यांनी तयार केलेला भव्य नंदीबैल.

तब्बल सात फूट पाच इंच उंच आणि आठ फूट लांब असलेला हा नंदीबैल तब्बल सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आला आहे. त्यावर करण्यात आलेले अतिशय बारीक आणि आकर्षक नक्षीकाम पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता वाढली आहे. या भव्य नंदीबैलाची किंमत तब्बल ८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

तान्हा पोळा जवळ येत असल्याने लहान मुलांसाठी नंदीबैल खरेदी करण्यासाठी पालकांचीही बाजारात मोठी लगबग सुरू झाली आहे. आपल्या मुलाला आवडणारा नंदीबैल निवडण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करत असून, विविध आकार आणि किंमतींचे पर्याय उपलब्ध असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.

आधुनिक काळात शेतीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टर आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला आहे. तरीही शेतीच्या वाटचालीत बैलांचे योगदान आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता आजही ग्रामीण संस्कृतीत कायम आहे.

२३७ वर्षांची परंपरा, लाखोंच्या किमतीचे नंदीबैल आणि बाजारात जमलेली नागरिकांची गर्दी… नागपूरच्या तान्हा पोळ्याची हीच खासियत यंदाही पाहायला मिळत आहे. आधुनिक युगातही परंपरेची नाळ जपणारा तान्हा पोळा नागपूरकरांच्या उत्साहामुळे आजही तितकाच जिवंत असल्याचे चित्र लकडगंजच्या लकडा बाजारात पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button