AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती गणेशोत्सवासाठी १८०० पोलीस तैनात!

लेझर लाईटवर बंदी, डीजेवर पोलिसांची नजर; नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा

अमरावती : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेत गणेशोत्सवातील बंदोबस्त, ध्वनिप्रदूषण, डीजे, लेझर लाईट आणि वाहतूक व्यवस्थेबाबत महत्त्वाची माहिती दिली.

गणेशोत्सवासाठी शहरात १३५ पोलीस अधिकारी आणि सुमारे १८०० पोलीस अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबतच होमगार्ड आणि एसआरपीची अतिरिक्त मदतही घेतली जाणार आहे. संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात प्रतिबंधात्मक कारवाईलाही पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. सुमारे १८०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी जवळपास ६० टक्के कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

यंदाच्या गणेशोत्सवात एक मंडळ, एक पोलीस ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस अंमलदार नियुक्त केला जाणार असून, गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून ते विसर्जनापर्यंत संबंधित मंडळाच्या संपर्कात राहून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक समन्वय साधला जाणार आहे.

ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरही पोलिसांनी गणेश मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि सायलन्स झोननुसार निर्धारित डेसिबल मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. रेसिडेन्शियल परिसरासाठी ५५ डेसिबलची मर्यादा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या डीजे किंवा ध्वनिक्षेपकांवर कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाईही होऊ शकते.

याशिवाय गणेशोत्सवात लेझर लाईट आणि लेझर बीमच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहणार आहे. लेझरचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावरही पोलिसांचा विशेष भर राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्यात येणार असून, ठाणेदार आणि पोलीस अधिकारी स्वतः ऑन रोड राहून परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. यासोबतच शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या परिसरात पायी पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे.

नागरिकांना कोणतीही अनुचित घटना, संशयास्पद हालचाल किंवा ध्वनिप्रदूषणासंदर्भात तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी पोलीस हेल्पलाइन तसेच ११२ क्रमांकावर माहिती देता येणार आहे.

गणेशोत्सव हा श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नागरिकांनीही शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि दुसरीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त… १८०० पोलीस अंमलदार, १३५ अधिकारी, मंडळनिहाय पोलीस नियुक्ती, लेझरवर बंदी आणि डीजेच्या आवाजावर करडी नजर यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी अमरावती पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button