सावरबंधच्या शांततेची धुरा आता जयंत बडवाईकांकडे

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड; ग्रामस्थांकडून निवडीचे स्वागत
भंडारा | साकोली
साकोली तालुक्यातील सावरबंध येथे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी जयंत कृष्णराव बडवाईक यांची अविरोध निवड करण्यात आली. २ सप्टेंबर रोजी झालेल्या तहकूब ग्रामसभेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह महिला आणि पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील तंटे आणि वाद गावपातळीवरच सामोपचाराने सोडवून शांतता, सामाजिक सलोखा आणि ग्रामस्थांमधील एकोपा कायम ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी आता जयंत बडवाईक यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांची अविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत निवडीचे स्वागत केले.
जयंत बडवाईक यांना सामाजिक क्षेत्रातील कामाचा अनुभव असून, साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीचे सदस्य तसेच भंडारा जिल्हा शांतता समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचीच ही पावती असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून गावातील वाद वाढण्यापूर्वीच संवादातून त्यावर तोडगा काढणे, मतभेदांना सामंजस्याची दिशा देणे आणि ग्रामस्थांमधील परस्पर विश्वास व एकोपा टिकवून ठेवणे, हे जयंत बडवाईक यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.
त्यांच्या सामाजिक अनुभवाचा आणि शांतता समितीतील कार्याचा सावरबंध गावातील तंटे मिटवण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अविरोध निवडीमुळे गावात सामाजिक सलोखा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
साहिल रामटेके | भंडारा



