AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

अमरावतीत नाल्यात रुग्णालयाचा बायोवेस्ट टाकताना प्रकार उघडकीस

महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी वाहन थांबवून संबंधितांना धरले धारेवर; रुग्णालयावर दंडात्मक कारवाईचे आदेश

अमरावती : शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतानाच आता रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा थेट नाल्यात टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी रविवारी अचानक पाहणीदरम्यान हा प्रकार स्वतःच्या निदर्शनास येताच संबंधितांना रोखले आणि रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.

राजापेठकडून राजकमलकडे जात असताना अंबापेठ प्रभागातील नमुना परिसरातील नाल्याजवळ एका कटला रिक्शामधून रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा नाल्यात टाकला जात असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून संबंधितांची चौकशी केली. प्राथमिक चौकशीत हा जैववैद्यकीय कचरा जवळच असलेल्या होप हॉस्पिटलचा असल्याचे समोर आले.

महापौरांनी संबंधितांना नाल्यात जैववैद्यकीय कचरा टाकण्यापासून रोखत तातडीने राजापेठ झोनचे सहायक आयुक्त भूषण पुसतकर आणि अंबापेठ प्रभागाचे आरोग्य निरीक्षक यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर रुग्णालयाच्या संचालकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा नाल्यात का टाकण्यात येत होता, याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र, या प्रकाराबाबत रुग्णालयाच्या संचालकांकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

यानंतर महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी स्वीकृत नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे यांच्यासह महापालिका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या कारवाईदरम्यान शहरातील अस्वच्छतेचे आणखी एक वास्तव समोर आले. ज्या नाल्यात जैववैद्यकीय कचरा टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, तो नाला स्वतःच मोठ्या प्रमाणात कचऱ्याने भरलेला असल्याचे दिसून आले. हा नाला अनेक महिन्यांपासून स्वच्छ करण्यात आलेला नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

अमरावती शहरात वेळेवर कचरा उचलला जात नाही, नाल्यांची नियमित सफाई होत नाही आणि अनेक ठिकाणी नागरिकांकडूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो, अशा तक्रारी सातत्याने होत आहेत. या मुद्द्यांवर महापालिकेच्या आमसभेतही यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे.

महापौरांनी नागरिकांना शहरात कुठेही कचरा न टाकता महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जैववैद्यकीय कचरा नाल्यात टाकण्यासारख्या गंभीर प्रकारांवर कारवाई करताना महापालिकेने स्वतःच्या अखत्यारितील नाल्यांची नियमित स्वच्छताही सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

त्यामुळे आता संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केव्हा होते, यासोबतच अनेक महिन्यांपासून कचऱ्याने भरलेल्या नमुना परिसरातील नाल्याची स्वच्छता महापालिका प्रशासन किती दिवसांत करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button