आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आक्रमक; हजारो विद्यार्थी यवतमाळकडे रवाना!

आठ दिवस आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्याचा आरोप; मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी घेरावाचा इशारा
अमरावती/यवतमाळ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक वळण घेतले आहे. मागील आठ दिवसांपासून अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करूनही मागण्या मान्य न झाल्याचा आरोप करत हजारो आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आता थेट यवतमाळच्या दिशेने रवाना झाले आहेत.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
खांद्यावर कॉलेजची बॅग, हातात संविधान आणि बिरसा मुंडांचा फोटो
या आंदोलनाचे विशेष लक्षवेधी चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थी आपल्या महाविद्यालयीन बॅगा खांद्यावर घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या हातात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान बिरसा मुंडा यांचा फोटो आणि भारतीय संविधान पाहायला मिळत आहे.
शिक्षण, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
आठ दिवस आंदोलन, तरीही ठोस निर्णय नाही?
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मागील आठ दिवसांपासून अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. मात्र, आठ दिवस उलटूनही मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
त्यामुळे आता आंदोलनाची दिशा थेट सरकारच्या प्रतिनिधींकडे वळवण्यात आली आहे.
मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी घेरावाचा इशारा
हजारो विद्यार्थी यवतमाळच्या दिशेने रवाना झाले असून, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या या भूमिकेमुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हजारो विद्यार्थी एकत्रितपणे यवतमाळकडे जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.
सरकार काय निर्णय घेणार?
आठ दिवसांच्या आंदोलनानंतरही मागण्या मार्गी न लागल्याने विद्यार्थ्यांनी आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार तातडीने तोडगा काढणार का, यवतमाळमध्ये प्रशासन आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाणार आणि मंत्री अशोक उईके यांच्याकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिरसा मुंडांचा फोटो आणि हातात संविधान घेऊन हजारो विद्यार्थी यवतमाळच्या दिशेने निघाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.



