गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव? वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन अन् रोजगाराचे प्रश्न कायम; आधी मूलभूत सुविधा द्या, मग उद्योग आणा, अशी मागणी
गडचिरोली : गडचिरोलीच्या विकासाच्या नावावर मोठमोठ्या उद्योगांची स्वप्नं दाखवली जात असली, तरी जिल्ह्यातील मूलभूत सुविधांची अवस्था अद्याप जैसे थे असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन आणि रोजगाराचे प्रश्न कायम असताना उद्योगांच्या घोषणांचा फायदा नेमका कुणाला होणार? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था अद्याप अपुरी असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे सांगत चामोर्शी येथे नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ही आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाचे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी नाराजीही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब आहे, शाळांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, तर सिंचन प्रकल्पही रखडलेले आहेत. मग अशा परिस्थितीत केवळ उद्योगांच्या घोषणा कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार यांनी सरकारला आधी जिल्ह्यातील मूलभूत सुविधा मजबूत करण्याची मागणी केली. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा सक्षम केल्यानंतरच उद्योग आणण्याचे नियोजन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मागील दोन वर्षांत सर्पदंशामुळे २८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.
यासोबतच आदिवासी विभागाच्या मंजूर निधीपैकी मागील वर्षी केवळ २९ टक्के निधी खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला. आश्रमशाळा आणि सिंचनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसताना अदानी समूहाला हजारो हेक्टर जमीन देण्याची घाई सरकारला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, गडचिरोलीच्या विकासाला काँग्रेसचा विरोध नाही, असे स्पष्ट करत विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे हक्क आणि जिल्ह्याची नैसर्गिक संपत्ती धोक्यात येणार असेल, तर त्याला विरोध केला जाईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
गडचिरोलीचा विकास झाला पाहिजे, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याच्या नैसर्गिक संपत्तीवर स्थानिकांचा हक्क कायम राहिला पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. त्यामुळे उद्योगांच्या घोषणांसोबतच गडचिरोलीतील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सरकार काय ठोस पावले उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे.



