ग्रामसभेत सरपंचांचे व्हिडीओ, सोशल मीडियावर रील; सरपंच संघटना आक्रमक

बदनामी आणि मानसिक त्रास होत असल्याचा आरोप; अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच संघटनेचे पोलिसांना निवेदन
गोंदिया : ग्रामसभेदरम्यान सरपंचांना घेरून त्यांचे व्हिडीओ तयार करणे आणि त्यानंतर त्याचे रील बनवून फेसबुक, इंस्टाग्रामसह सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकाराविरोधात अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. अशा प्रकारांमुळे सरपंचांची बदनामी होत असून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याप्रकरणी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, ग्रामसभांमध्ये सचिवांच्या अनुपस्थितीमुळे अनेकदा बैठकीची जबाबदारी सरपंचांवर येते. मात्र ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व रेकॉर्ड आणि माहिती प्रत्येक वेळी तत्काळ उपलब्ध नसल्याने ग्रामसभेत उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देणे शक्य होत नाही.
याच परिस्थितीचा काही व्यक्तींकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला आहे. ग्रामसभेदरम्यान सरपंचांचे व्हिडीओ शूट केले जातात. त्यानंतर त्यातून रील तयार करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाते. यामुळे सरपंचांची प्रतिमा मलिन होत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

ग्रामसभा हे नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे लोकशाहीचे व्यासपीठ आहे, बदनामीचे माध्यम नाही, अशी भूमिका सरपंच संघटनेने घेतली आहे. ग्रामसभेतील चर्चेचा गैरवापर करून कोणाचीही बदनामी होऊ नये, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पद्धतीने व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
आता या निवेदनाची पोलीस प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सरपंच आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.



