१३ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता; पोलिसांनी ८ ते १० तासांत रेल्वे स्थानकावरून शोधले

कपडे आणि आधार कार्ड घेऊन घराबाहेर पडली होती; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलगी सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन
नागपूर : घरातील कोणालाही काहीही न सांगता कपडे आणि आधार कार्ड घेऊन घरातून निघून गेलेल्या १३ वर्षीय मुलीचा पोलिसांनी अवघ्या ८ ते १० तासांत शोध लावला आहे. मुलगी रेल्वे स्थानकावर सुखरूप आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडिलांचे फारकत झाल्यानंतर दोघांनीही दुसरे लग्न केले. त्यामुळे ही मुलगी तिच्या आजी-आजोबांकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्याजवळ मोबाईल आढळून आला होता. या मोबाईलवरून ती वर्गमित्र आणि मैत्रिणींशी इन्स्टाग्रामवर बोलत असल्याचे समोर आल्यानंतर आजी-आजोबा आणि मामाने तिला रागावल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर मुलगी काही दिवस शाळेतही गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, तिने आपल्या मैत्रिणींना आपण गुजरातला आईकडे जाणार असल्याचे सांगितले होते.
यानंतर काल दुपारच्या सुमारास मुलगी घरातून कपडे आणि आधार कार्ड घेऊन कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. रात्री सुमारे ११ वाजता कुटुंबीयांनी मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. मुलगी गुजरातला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रेल्वे स्थानकांसह विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली.
तपासादरम्यान मुलगी रेल्वे स्थानकावर आढळून आली. पोलिसांच्या सूचनेनुसार रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या पथकाने रेल्वे स्थानकावर जाऊन मुलीला ताब्यात घेतले.
तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या ८ ते १० तासांत मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. मुलगी सुखरूप मिळाल्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त झोन-५ नित्यानंद झा आणि एसीपी रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा वेळेत शोध लागला आणि संभाव्य धोका टळला. घरातून निघून गेलेल्या १३ वर्षीय मुलीचा अवघ्या काही तासांत शोध घेत तिला सुखरूप कुटुंबीयांकडे सोपवण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.



