नो एन्ट्रीचा फज्जा? मोरबागमध्ये ओव्हरलोड ट्रक शिरल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह

प्रवेशबंदी आदेशानंतरही शहरात ट्रकची एंट्री; वाहतूक कोंडीने अंमलबजावणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
अमरावती | प्रतिनिधी
राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण ट्रक अपघातानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती शहरात दिवसा जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, या आदेशाला हरताळ फासत एक ओव्हरलोड ट्रक थेट मोरबाग परिसरात शिरल्याची घटना समोर आली आहे. अरुंद रस्त्यात ट्रक अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राजापेठ उड्डाणपुलावरील अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले होते. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र, काही दिवसांतच मोरबाग परिसरात घडलेल्या घटनेमुळे या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक ओव्हरलोड ट्रक शहरात प्रवेश करून मोरबाग परिसरातील अरुंद रस्त्यावर अडकला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालक आणि नागरिकांना बराच वेळ अडचणींचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुढे आला आहे तो म्हणजे हा ट्रक शहरात नेमका कोणत्या मार्गाने दाखल झाला? ज्या मार्गांवरून ट्रक शहरात आला, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता का? बंदोबस्त असल्यास ट्रकला अडवण्यात का आले नाही? तसेच नो एन्ट्रीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात कुठे त्रुटी राहिल्या का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
राजापेठ दुर्घटनेनंतर जड वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, मोरबागमधील या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाच प्रकारे जड वाहने शहरात प्रवेश करत राहिली, तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ट्रकच्या प्रवेशाचा मार्ग निश्चित करावा, कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नो एन्ट्रीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोरबागमध्ये ओव्हरलोड ट्रक पोहोचल्याची घटना ही केवळ वाहतूक कोंडीपुरती मर्यादित नसून, शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि नो एन्ट्रीच्या अंमलबजावणीची प्रभावीता तपासण्याची वेळ आल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्रशासन कोणती भूमिका घेते आणि जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



