उजनी जलाशयात ‘सकरमाऊथ कॅटफिश’चा विळखा; मच्छिमारांवर उपासमारीची वेळ

आक्रमक परदेशी माशामुळे स्थानिक मत्स्यसंपदा धोक्यात; जाळ्यांचे नुकसान, उत्पन्नात मोठी घट
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात गेल्या काही वर्षांपासून ‘सकरमाऊथ कॅटफिश’ (Suckermouth Catfish) या आक्रमक परदेशी माशाची संख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा सर्वाधिक फटका स्थानिक मच्छिमारांना बसत आहे. या माशामुळे पारंपरिक मत्स्य व्यवसाय संकटात सापडला असून मच्छिमारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे.
स्थानिक मच्छिमारांच्या माहितीनुसार, पूर्वी त्यांच्या जाळ्यात रोहू, कटला, चिलापी यांसारखे विक्रीयोग्य मासे मोठ्या प्रमाणात मिळत होते. मात्र आता बहुतांश जाळ्यांमध्ये सकरमाऊथ कॅटफिशच अडकत असल्याने मत्स्य व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे.
या माशाच्या शरीरावर कठीण कवच आणि तीक्ष्ण काटे असल्यामुळे त्याला जाळ्यातून बाहेर काढताना जाळे फाटते. काही वेळा मासा काढण्यासाठी जाळे ब्लेडने कापावे लागते. त्यामुळे मच्छिमारांना दर पंधरा दिवसांनी नवीन जाळे खरेदी करावे लागत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यामुळे मासेमारीचा खर्च वाढला असून उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मच्छिमारांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी दिवसाला ५० ते १०० किलो विक्रीयोग्य मासे मिळत असत; मात्र आता ही संख्या केवळ १० ते २० किलोपर्यंत घसरली आहे.
दरम्यान, सकरमाऊथ कॅटफिशला स्थानिक बाजारात विशेष मागणी नसल्याने त्याला फारसा भाव मिळत नाही. काही व्यापारी हा मासा केवळ सुमारे ५ रुपये प्रतिकिलो दराने तेल किंवा फिश पावडर तयार करणाऱ्या उद्योगांसाठी खरेदी करतात. त्यामुळे मच्छिमारांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सकरमाऊथ कॅटफिश हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी परिसरातील मासा आहे. भारतात तो सुरुवातीला मत्स्यालय आणि फिश टँक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘क्लिनर फिश’ म्हणून आणण्यात आला होता. मात्र काही ठिकाणी हा मासा नैसर्गिक जलाशयात पोहोचल्यानंतर त्याची संख्या वेगाने वाढू लागली.
Bombay Natural History Society (BNHS) च्या अभ्यासानुसार, हा एक आक्रमक परदेशी मासा असून स्थानिक जलाशयांमध्ये त्याचा नैसर्गिक भक्षक नसल्यामुळे त्याची वाढ वेगाने होते. त्याची प्रजनन क्षमता देखील अत्यंत जास्त असल्याने अल्पावधीतच त्याची संख्या अनेक पटींनी वाढते.
हा मासा जलाशयाच्या तळाशी राहून गाळ आणि वनस्पती खरवडून खातो. त्यामुळे पाणी गढूळ होते, सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचत नाही आणि स्थानिक माशांची अंडी, पिल्ले तसेच नैसर्गिक अन्नसाखळीवर प्रतिकूल परिणाम होतो. परिणामी संपूर्ण जलपरिसंस्थेच्या जैवविविधतेसमोर मोठे आव्हान निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने या आक्रमक प्रजातीच्या विक्री आणि पालनावर बंदी घातली आहे. तसेच बीएनएचएस आणि मत्स्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक माशांचे संवर्धन, मत्स्यबीज सोडणे आणि सकरमाऊथ माशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मात्र या उपाययोजनांचे परिणाम कितपत प्रभावी ठरतात आणि मच्छिमारांचे वाढते आर्थिक नुकसान कसे भरून काढले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, अशा आक्रमक परदेशी प्रजाती केवळ जैवविविधतेलाच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्था आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेलाही गंभीर धोका निर्माण करतात. त्यामुळे जलाशयांचे संरक्षण आणि आक्रमक प्रजातींवर प्रभावी नियंत्रणासाठी अधिक कठोर आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.



