citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

मनसर उड्डाणपुलावरील खड्डा तीन दिवसांनंतरही कायम; मनसेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दोन दिवसांचा अल्टिमेटम

दुरुस्ती रखडल्याने वाहनचालकांमध्ये संताप; काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

रामटेक (जि. नागपूर) | प्रतिनिधी

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मनसर उड्डाणपुलावर पडलेला खड्डा तीन दिवस उलटूनही बुजविण्यात आलेला नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्राधिकरणाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रामटेक तालुक्यातील मनसर उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांसमोर धोका निर्माण झाला आहे. नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग हा विदर्भ आणि मध्यप्रदेशला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड तसेच हलक्या वाहनांची वर्दळ असते.

खड्डा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. मात्र, पाहणीनंतरही प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दररोज या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुकाध्यक्ष राकी चवरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांच्या आत खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निर्धारित मुदतीत काम सुरू न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस किंवा कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस शासन आणि प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी मनसर उड्डाणपुलावरील खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुढील दोन दिवसांत कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button