मोक्का कायद्यातील फरार आरोपी नागपूर पोलिसांच्या जाळ्यात; पिस्तूल, चाकूंसह ₹1.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑटोमोटिव्ह चौकाजवळ पाठलाग करून आरोपीला पकडले; शस्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहर पोलिसांनी मोक्का (MCOCA) कायद्यातील फरार आरोपीला अटक करत मोठे यश मिळविले आहे. कारवाईदरम्यान आरोपीकडून गावठी पिस्तूल, धारदार चाकू, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ₹1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पीएसआय क्षीरसागर यांच्या तपास पथकाला मोक्का कायद्यातील फरार आरोपीचा शोध सुरू असताना, ऑटोमोटिव्ह चौक ते वीटभट्टी मार्गावरील एजीएस गॅस पंपाजवळ एक संशयित व्यक्ती उभी असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना पाहताच संशयिताने आपल्या दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शानू उर्फ गोलू मनोज वैद्य (वय 24), रा. आनंद नगर, एनआयटी क्वार्टर, यशोधरा नगर, नागपूर असे सांगितले.
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक धारदार चाकू, पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा दुचाकी आणि व्हिव्हो कंपनीचा मोबाईल असा एकूण ₹1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात हा आरोपी १६ मे २०२६ रोजी दाखल गुन्हा क्रमांक ३८९/२०२६ मधील मोक्का कायद्यांतर्गत फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार कलम ३/२५ अंतर्गतही गुन्ह्याची भर घालण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. ओव्हळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पीएसआय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंद पाटील, राहुल बोंदरे, संदीप वानखेडे, भूषण यरावर, मनीष झारकर, क्षितिज चौरे, आशिष पिपरहाटे आणि प्रवीण मनावरते यांच्या पथकाने पार पाडली.



