citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

राजस्थानला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरात घरफोडी; नागपूर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद

दोन आयफोन, रोकड व दुचाकीसह ₹1.12 लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडीचा गुन्हा काही दिवसांत उघड

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात राजस्थानला फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही दिवसांत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन आयफोन, रोकड, मोबाईल चार्जर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ₹1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी संकेत खडगे (वय 20) हे आपल्या कुटुंबासह राजस्थान येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, 23 जुलै रोजी त्यांच्या नातेवाईकांनी फोन करून घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली.

फिर्यादी परत आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश उर्फ गनू विनोद बघेल (वय 19, रा. तेलंगखेडी बागडी) आणि मनीष नानू जयस्वाल (वय 20, रा. हजारी पहाड) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत दोन्ही आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून दोन आयफोन, ₹14 हजार 600 रुपयांची रोकड, मोबाईल चार्जर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण ₹1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या यशस्वी कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय इंगळे आणि डीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांनी नागरिकांना घर दीर्घकाळ बंद ठेवताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button