अमरावतीत नाल्यात नवजात शिशूचा मृतदेह आढळला

लक्ष्मी नगर झेंडा चौक परिसरातील घटना; गाडगे नगर पोलिसांकडून सखोल तपास सुरू
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात बुधवारी सकाळी एका नाल्यात नवजात शिशूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिंद्रा कॉलनीतील आसरा माता मंदिर परिसरातून वाहत आलेला हा मृतदेह छोट्या नाल्याद्वारे मोठ्या नाल्यात पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लक्ष्मी नगर येथील झेंडा चौकाजवळ अनंता परिसे यांच्या घरासमोरील नाल्यात सफाई कर्मचाऱ्यांना हा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने गाडगे नगर पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
नवजात शिशूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, मृतदेह नाल्यात कसा आला आणि या घटनेमागे नेमकी काय कारणे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून स्थानिक नागरिकांची चौकशीही सुरू आहे.
शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.



