तेलंगणातील भीषण अपघातात नांदेडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

संगारेड्डी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 161 वरील दुर्घटना; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
नांदेड / संगारेड्डी | प्रतिनिधी
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर झालेल्या भीषण अपघातात नांदेड येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचाही समावेश असून, या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास संगारेड्डी जिल्ह्यातील बचूपल्ली परिसरात हा अपघात घडला. नांदेड शहरातील बागबान कॉलनी परिसरात राहणारे एक कुटुंब कारने हैदराबाद विमानतळाकडे निघाले होते. सऊदी अरेबियातून उमराह करून परतणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी ते विमानतळावर जात होते.
प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर अचानक एक दुचाकी कारसमोर आल्याने चालकाने ती वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून वाहन अनेक वेळा पलटी झाले. त्यानंतर कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. अपघाताचा जोर इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या भीषण अपघातात मौलाना मोहम्मद नदीम, त्यांची आई शमीमा बेगम आणि अवघ्या चार वर्षांच्या अनाबिया तस्कीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे धाकटे बंधू नविद गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.
या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे नांदेड शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, आनंदाच्या क्षणासाठी निघालेला प्रवास एका कुटुंबासाठी दुःखद ठरल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.



