citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

डोंबिवलीत प्रियकराची हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये लपवल्याचा आरोप

व्हॉईस मेसेजनंतर उघडकीस आला प्रकार; संशयित महिला कोलकात्याकडे फरार, तीन विशेष पथके शोधमोहीमेवर

डोंबिवली | प्रतिनिधी

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह बाथरूममध्ये पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एका महिलेवर तिच्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह लपविल्याचा संशय असून, घटना उघडकीस आल्यानंतर ती कोलकात्याकडे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बाथरूममधील पाण्याचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सोसायटीतील रहिवाशांनी गेल्या अडीच महिन्यांपासून संबंधित फ्लॅटमधून सतत पाणी वाहत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर घरमालक अजय पाटील यांनी भाडेकरू महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, घरमालकाला संबंधित महिलेचा एक व्हॉईस मेसेज प्राप्त झाला. या मेसेजमध्ये तिने प्रियकराच्या हत्येबाबत कबुली दिल्याचा आणि बाथरूममध्ये ठेवलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंती केल्याचा दावा करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे घरमालकाने मानपाडा पोलिसांकडे धाव घेतली.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा उघडला. बाथरूममध्ये पोत्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वार झाल्याचे निष्पन्न झाले असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटना उघडकीस येण्यापूर्वीच संशयित महिला कोलकात्याकडे फरार झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच तिला ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येणार आहे. या घटनेमुळे डोंबिवली आणि कल्याण परिसरात भीती व चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button