धामणगाव रेल्वेत जैन समाजाच्या चातुर्मास वर्षावास 2026 पर्वाची भव्य सुरुवात

मंगल कलश यात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; चातुर्मासात चार महिने विविध आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन
धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे शहरात जैन धर्मीयांच्या पवित्र चातुर्मास (वर्षावास) 2026 पर्वाला आज भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला. महत्तम मनोहर शिष्य प्रज्ञनिधी प्रशान्तमना प्रियंकराश्रीजी महाराज यांच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या मंगल कलश यात्रेने संपूर्ण शहर भक्ती, अध्यात्म आणि अहिंसेच्या संदेशाने भारावून गेले.
जैन समाजाच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यानिमित्त महत्तम मनोहर शिष्य प्रज्ञनिधी प्रशान्तमना प्रियंकराश्रीजी महाराज तसेच त्यांच्या ठाणा-६ यांचे शहरात आगमन होताच समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या निमित्ताने शहरातून भव्य मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय जयघोषामुळे संपूर्ण शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यात्रेदरम्यान भजन गायक आशिष जैन यांनी स्वागतगीत आणि भक्तिमय भजनांच्या सादरीकरणातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण यात्रेला भक्तीची अनोखी छटा लाभली.
चातुर्मास समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्षावास पर्वात पुढील चार महिन्यांत विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये दररोज अमृतमयी प्रवचने, सामूहिक नवकार जप, तप-साधना, स्वाध्याय, प्रतिक्रमण तसेच युवक आणि बालकांसाठी संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या चातुर्मास पर्वाच्या माध्यमातून अहिंसा, संयम, साधना आणि आत्मकल्याणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. धार्मिक उपक्रमांमुळे समाजात नैतिक मूल्यांची जपणूक होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
धामणगाव रेल्वे शहरात सुरू झालेल्या या धार्मिक पर्वामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील चार महिने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे.



