परतवाड्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

भाड्याच्या घरात घडली घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
परतवाडा | प्रतिनिधी
परतवाडा शहरातील खेळलदेव माळी ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत बाबाराव राऊत हे मूडचा येवता येथील रहिवासी असून ते परतवाड्यात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. घरात कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
श्रीकांत राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परतवाडा पोलीस करत असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.



