स्वच्छता व पावसाळी तयारीचा मनपा आयुक्तांकडून आढावा

झोन क्रमांक तीनमध्ये डॉ. मंगेश गोंदावले यांची धडक पाहणी; नालेसफाई, कचरा व्यवस्थापनाबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक तीनमधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नालेसफाई, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
आयुक्तांनी मधुबन लेआउट, साधना कॉलनी, यशोदा नगर चौक, दस्तुरनगर चौक, संजय गांधी नगर आणि फ्रेजरपुरा स्मशानभूमी परिसराची पाहणी करत विविध विकासकामांची माहिती घेतली.
पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी नाल्यांची नियमित साफसफाई करणे, साचलेला गाळ तातडीने हटविणे आणि पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेताना दररोज नियमित कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी आकाशवाणी केंद्राजवळ तसेच लाल बंगला परिसरात प्रस्तावित नव्या कचरा संकलन केंद्रासाठी जागेची पाहणी करण्यात आली. शहरातील वाढत्या कचऱ्याचे शास्त्रोक्त आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
या पाहणीद्वारे स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. आता आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.



