सावनेरमध्ये क्रेटा कारची आयशर ट्रकला जोरदार धडक; मोठा अपघात टळला!

टाकळी गावाजवळील घटना; कार बॅरिकेडवर चढली, तर ट्रक शेतात घुसला; सुदैवाने जीवितहानी नाहीनागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात टाकळी गावाजवळ गुरुवारी सकाळी क्रेटा कार आणि आयशर ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कार अॅल्युमिनियम बॅरिकेडवर चढली, तर ट्रक रस्त्यालगतच्या शेतात घुसला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी टाकळी गावाजवळील रस्त्यावरून एक आयशर ट्रक पेट्रोल पंपाकडे वळत होता. याचदरम्यान मागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारने ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, कार रस्त्यावरील अॅल्युमिनियम बॅरिकेडवर चढली, तर ट्रक रस्त्यालगतच्या शेतात जाऊन घुसला.

या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने कारमधील व्यक्तींसह ट्रकचालकालाही कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर क्रेटा कारच्या चालकाने पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.



