मालेगावमध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर पथराव!

टिपू सुलतान चौकातील घटनेने खळबळ; आरोपींना तातडीने अटक करण्याची दुर्गा उत्सव मंडळाची मागणी
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान पथराव झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास टिपू सुलतान चौकात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पथराव करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मालेगाव दुर्गा उत्सव मंडळाने केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दुर्गा विसर्जन मिरवणूक टिपू सुलतान चौकातून जात असताना एका घरावर गुलाल उडवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काही तरुणांनी मिरवणुकीच्या दिशेने पथराव केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे मिरवणुकीदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, घटनेची नेमकी कारणे आणि पथरावात सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.
या घटनेनंतर मालेगाव दुर्गा उत्सव मंडळाने संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका मंडळाकडून मांडण्यात आली आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढविला आहे. नागरिकांनी शांतता राखावी, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.



