क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने 17.32 लाखांची फसवणूक; पश्चिम बंगालमधून आरोपी ताब्यात

नागपूर गुन्हे शाखा व सायबर पोलिसांची संयुक्त कारवाई; आंतरराज्यीय अथवा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटच्या दुव्यांची चौकशी सुरू
नागपूर | प्रतिनिधी
क्रिप्टोकरन्सीमध्ये कमी दरात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १७ लाख ३२ हजार ६१२ रुपयांची कथित फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामागे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हंसापुरी परिसरातील रहिवासी रोहित जागरे यांच्याशी आरोपी पोलाब पार्थ सरकार याने संपर्क साधला. कमी किमतीत USDT (Tether) ही क्रिप्टोकरन्सी उपलब्ध करून देण्याचे तसेच प्रसिद्ध क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म Binance च्या माध्यमातून व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन देत त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने स्वतःच्या तसेच विविध बँक खात्यांमध्ये एकूण १७ लाख ३२ हजार ६१२ रुपये जमा करून घेतल्याचा आरोप आहे. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर कोणतीही USDT अथवा अन्य क्रिप्टोकरन्सी हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेच्या युनिट-३ आणि सायबर पथकाने संयुक्त तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण, डिजिटल आर्थिक व्यवहारांचा मागोवा आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विशेष पथकाने तेथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी नागपूर येथे आणले.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या फसवणुकीमागे आंतरराज्यीय अथवा आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित बँक खाती आणि इतर संभाव्य संशयितांचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवहारांची खातरजमा करावी, अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तात्काळ सायबर पोलिसांकडे माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



