हार्डवेअर दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड; पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग

कळमना पोलिसांची कारवाई; चोरीतील ६९.५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हार्डवेअर दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणण्यात कळमना पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग निष्पन्न झाला असून पोलिसांनी चोरीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ते ३ जुलैदरम्यान जुना कामठी रोड परिसरातील देवकरतार स्टील इंडस्ट्रीज या हार्डवेअर दुकानात घरफोडीची घटना घडली होती. दुकानाचे मालक विक्रम कुकरेजा यांनी दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे मागील शटर तोडून आत प्रवेश केला.
यावेळी सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, नळाच्या फिटिंगचे सुमारे ३५० पार्ट्स तसेच सुमारे ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा शिक्का असा एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान या गुन्ह्यात पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणातील चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
दरम्यान, बालकांशी संबंधित प्रकरण असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



