AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

बडनेरा मतदारसंघात मतदार यादी पडताळणीसाठी काँग्रेसचा पुढाकार

BLO-2 प्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण; मतदार नोंदणी, पडताळणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांना मिळणार मदत

अमरावती | प्रतिनिधी

मतदार यादी विशेष पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने मतदार नोंदणी आणि मतदान यादी पडताळणीसाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना मतदान यादीत नावाची पडताळणी, नवीन नावनोंदणी तसेच आवश्यक दुरुस्त्यांसाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी BLO-2 प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत असून त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अमरावती येथील संत गाडगे महाराज विद्यालयात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदार यादी पडताळणीची प्रक्रिया, नवीन मतदार नोंदणी, नाव, पत्ता व इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती तसेच नागरिकांना प्रभावी मार्गदर्शन करण्याबाबत प्रतिनिधींना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

आयोजकांच्या माहितीनुसार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार देशभरात काँग्रेस पक्षाकडून BLO-2 प्रतिनिधी नियुक्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश मतदान यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची नावे नोंदविणे आणि नागरिकांना मतदार नोंदणी प्रक्रियेत आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत अमरावती आणि बडनेरा परिसरातील नागरिकांना मतदान यादीत नाव आहे की नाही याची पडताळणी, नवीन मतदार नोंदणी, तसेच नाव, पत्ता किंवा इतर आवश्यक दुरुस्त्यांसाठी मदत करण्यात येणार आहे. यासाठी हेल्पलाईन सेंटर आणि स्वतंत्र संकेतस्थळाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान किशोर बोरकर आणि समीर जवंजाल यांनी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून आवश्यक दुरुस्त्या वेळेत करून घ्याव्यात, असे आवाहन केले.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याने मतदार यादी अद्ययावत ठेवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button