बडनेरा खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई; शेख सलमान शेख शकुरला ताब्यात घेऊन बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून बडनेरा येथील खूनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला बडनेरा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे २०२६ रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिरोज खान मन्नान खान आणि अब्दुल जाकीर अब्दुल आहाज यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, शेख सलमान शेख शकुर (वय २६) हा आरोपी फरार होता. या प्रकरणाचा समांतर तपास अमरावती शहर गुन्हे शाखेकडून सुरू होता.
८ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की फरार आरोपी गुलिस्ता नगर परिसरात आपले अस्तित्व लपवून राहत आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
कारवाईनंतर आरोपीला पुढील तपासासाठी बडनेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अटकेमुळे खूनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस करत असून या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचाही तपास सुरू आहे.



