citynewsLatest NewsMaharashtraMumbai

भांडुपमध्ये बेस्ट बसचा अपघात; पादचारी गंभीर जखमी

रिव्हर्स घेताना पादचाऱ्याला धडक; बसवरील नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकी आणि रिक्षाचेही नुकसान

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील भांडुप परिसरात बेस्ट बसचा अपघात होऊन एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. बस रिव्हर्स घेत असताना पादचाऱ्याला धडक बसल्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी व एका ऑटो रिक्षालाही धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप येथील कोंकण नगर परिसरात बेस्ट बस उजव्या बाजूला वळण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, रस्ता अरुंद असल्याने बस व्यवस्थित वळू शकली नाही. त्यामुळे चालकाने बस रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली.

रिव्हर्स घेत असताना बसच्या मागील भागाची एका पादचाऱ्याला धडक बसली. या धडकेत संबंधित व्यक्ती बसच्या मागील भाग आणि तेथील मोठ्या प्लांटरच्या मध्ये अडकली. घटना पाहताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

जखमीला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी बसला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी बस अचानक पुढे सरकल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातात जखमी पादचाऱ्याच्या दोन्ही मांड्यांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. बसमधील वाहकाने (कंडक्टर) तातडीने जखमीला मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि बेस्टचे बस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून अपघाताची माहिती भांडुप पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण, चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले आणि घटनेस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षितता आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button