citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

पाचपावली पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीप्रकरणी दोन सराईत चोरटे जेरबंद

दोन घरफोडींची उकल; तब्बल ६३.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त, जुन्या गुन्ह्याचीही कबुली

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, आरोपींकडून एकूण ६३ लाख ९९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी दहा महिन्यांपूर्वी घडलेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिल्याने तपासात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात फिर्यादीच्या भावाचे कुटुंब राजस्थानमधील खाटूश्याम मंदिर येथे दर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट आणि लॉकर फोडून सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचपावली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाला गती दिली. तपासादरम्यान दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपींकडून या घरफोडीतील ५९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत आरोपींनी दहा महिन्यांपूर्वी लष्करीबाग परिसरात घडलेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील सुमारे ४ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने देखील पोलिसांनी हस्तगत केले.

दोन्ही गुन्ह्यांमधील मिळून ६३ लाख ९९ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या यशस्वी कारवाईमुळे दोन गंभीर घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवज परत मिळाल्याने संबंधित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे या गुन्ह्यांची उकल शक्य झाली असून, आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाचपावली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button