वाढदिवस आणि षष्टिपूर्तीचा अनोखा उत्सव; डॉक्टर दांपत्याने आयोजित केले भव्य रक्तदान शिबिर

डॉ. अविनाश चौधरी आणि डॉ. राधा चौधरी यांचा समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम; ५० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील सुप्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांच्या षष्टिपूर्ती निमित्त आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राधा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैयक्तिक आनंदाचा क्षण समाजसेवेसाठी समर्पित करत डॉक्टर दांपत्याने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
अमरावतीतील खापर्डे बगीचा परिसरातील संकल्प चौधरी मॅटर्निटी हॉस्पिटल अँड डायलिसीस सेंटर येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
शिबिरात आतापर्यंत ५० हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले असून, या रक्ताचा उपयोग गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी होणार आहे. रक्ताची गरज कोणालाही, कोणत्याही वेळी भासू शकते. अशा वेळी स्वेच्छेने केलेले रक्तदान अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
डॉ. अविनाश चौधरी आणि डॉ. राधा चौधरी यांनी वैयक्तिक आनंद साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
वाढदिवस आणि षष्टिपूर्तीसारख्या वैयक्तिक सोहळ्याला समाजसेवेची जोड देत डॉक्टर दांपत्याने समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून, समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.



