AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ८ हजार ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

युवा स्वाभिमान पार्टी व भाजपाचा गुणगौरव सोहळा; विद्यार्थ्यांसह मातांचाही सन्मान, अमरावतीला शैक्षणिक-औद्योगिक केंद्र बनविण्याचा संकल्प

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीतील दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तब्बल ८ हजार ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या यशामागील मातांच्या योगदानालाही विशेष सन्मान देण्यात आला.

अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार रवि राणा आणि भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनित राणा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हा शहराध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे, हरप्रीत मिनहास, प्रकाश साबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या मातांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे आईच्या त्याग आणि योगदानाची दखल घेत त्यांना साडी भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक बॅग, नोटबुक, पेन, वॉटर बॉटल आणि टिफीन बॉक्सचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा देत त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

यावेळी नवनित राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने अमरावतीमध्ये अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागू नये, यासाठी अमरावतीला शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आमदार रवि राणा यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन करत सातत्य, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यशाचे नवे शिखर गाठण्याचा संदेश दिला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मातांच्या त्यागाचा सन्मान आणि अमरावतीच्या सर्वांगीण विकासाचे मांडलेले व्हिजन यामुळे हा गुणगौरव सोहळा केवळ सत्कार कार्यक्रम न ठरता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा संस्मरणीय सोहळा ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button