यशवाडी हनुमान मंदिरात भीषण दुर्घटना; सभामंडपाचे छत कोसळून अनेक भाविक मलब्याखाली

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू; अनेक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
परभणी प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध यशवाडी हनुमान देवस्थानात आज एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या बांधकामादरम्यान छत आणि काही खांब अचानक कोसळल्याने अनेक भाविक मलब्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवाडी हनुमान मंदिराच्या गर्भगृहासमोर नव्याने सभामंडप उभारण्याचे काम सुरू होते. याच बांधकामादरम्यान अचानक सभामंडपाचे छत आणि आधारस्तंभ कोसळले. घटनेच्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
छत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक भाविक मलब्याखाली अडकल्याने आरडाओरड सुरू झाली. सुरुवातीच्या माहितीनुसार 20 ते 25 भाविक मलब्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले असून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू आहे.
मलब्याखाली अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जखमी झालेल्या आठ ते दहा भाविकांना तातडीने उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मलब्याखालून आतापर्यंत पाच ते सहा भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
अद्याप काही भाविक मलब्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे प्रशासनाने संकेत दिले आहेत.



