“आम्हाला गॅस नको, पैसे नकोत; शेतमालाला भाव द्या, कर्जमाफी करा!” महिला शेतकऱ्याचा आक्रोश

पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर कपाशी; नांदेड जिल्ह्यातील कलदगाव येथे शेतकऱ्यांची हतबलता
नांदेड प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक संकट आणि आर्थिक अडचणींच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथे पावसाअभावी कपाशीचे पीक वाचवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान एका महिला शेतकऱ्याचा आक्रोश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
“आम्हाला गॅस नको, लाडक्या बहिणीचे पैसे नकोत. आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या आणि संपूर्ण कर्जमाफी करा,” अशी व्यथा मांडताना महिला शेतकरी पद्माबाई गव्हाणे यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे सध्या शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.
जून महिना संपत आला असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्रात झालेल्या अल्प पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी कपाशी आणि सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिके संकटात सापडली आहेत.
कलदगाव परिसरातही अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कपाशीची लागवड केली होती. परंतु आता पावसाअभावी पिके वाळण्याच्या मार्गावर असून ती जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी शेतकरी दूरवरून हंड्याने पाणी आणून कपाशीच्या रोपांना पाणी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकीकडे बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा वाढता खर्च, तर दुसरीकडे पावसाचा अभाव यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. पिकांचे भवितव्य अनिश्चित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकरी रावसाहेब गव्हाणे यांनीही पावसाअभावी कपाशीचे पीक वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राज्यातील लाखो शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतमालाला योग्य भाव, संपूर्ण कर्जमाफी आणि तातडीची मदत या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत असून, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.



