citynewsLatest NewsMaharashtraMumbai

गुलाबपुष्पांनी झाले स्वागत! अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत दिव्यांग सक्षमीकरण सचिवांचा संवाद

शाळा प्रवेशोत्सवानिमित्त व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंडला भेट; विद्यार्थ्यांना दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

मुंबई | प्रतिनिधी

शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ यांनी मुंबईतील ताडदेव परिसरातील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंध विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी डॉ. गुरसाळ यांनी विद्यालयातील विविध वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आयएएस परीक्षा, प्रशासकीय सेवेत जाण्यासाठीची तयारी आणि करिअरच्या संधी याबाबत विविध प्रश्न विचारले. डॉ. गुरसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सहज आणि प्रेरणादायी पद्धतीने उत्तरे देत त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके, अवर सचिव साईप्रसाद मुकदाडवार, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रूपाली पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या रजनी हिरमेठ तसेच संस्थेच्या अध्यक्षा मीना देशपांडे यांची उपस्थिती लाभली.

सन १९०२ मध्ये स्थापन झालेली व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड ही संस्था दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शतकाहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच निवास, भोजन, संगणक प्रशिक्षण, संगीत, क्रीडा आणि विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते.

मुंबईतील ताडदेव परिसरात कार्यरत असलेल्या या संस्थेने हजारो दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ग्रंथालय सुविधा आणि विविध कौशल्यविकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशेष असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button