Latest NewsMaharashtraNagpur

किचनमध्ये घुसला 5 फूट विषारी कोब्रा! सर्पमित्राच्या धाडसी रेस्क्यूने कुटुंबाचा जीव भांड्यात पडला

नागपूर शहरातील शंकरपूर परिसरात आज सकाळी एक थरारक घटना घडली. एका घराच्या किचनमध्ये तब्बल पाच फूट लांबीचा विषारी कोब्रा नाग शिरल्याने संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने सर्पमित्राच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागाला सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.

नागपूर शहरातील बेलतरोडी परिसरातील शंकरपूर येथे राहणाऱ्या श्रीमती शारदा संतोष या सकाळी आपल्या किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. त्याचवेळी त्यांच्या नजरेस किचनमधील आलमारीकडे सरकत जाणारा एक मोठा विषारी कोब्रा नाग दिसला.

जवळपास पाच फूट लांबीचा आणि फणा काढून बसलेला हा नाग पाहताच त्या घाबरून गेल्या. त्यावेळी किचनमध्ये त्यांची दोन लहान मुलेही उपस्थित होती. अचानक समोर आलेला विषारी नाग पाहून घरातील सर्व सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुले रडू लागली, तर कुटुंबीयांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन शारदा संतोष यांनी नागपूर पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला. तेथून त्यांना सर्पमित्र शुभम पराळे यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी तात्काळ मदतीसाठी संपर्क साधला.

माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराळे यांनी अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम सुरू केल्यानंतर कोब्रा नाग किचनमधील आलमारीखाली लपून बसल्याचे आढळून आले.

यानंतर सर्पमित्र शुभम यांनी अत्यंत सावधगिरीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र हा कोब्रा अत्यंत आक्रमक अवस्थेत होता. रेस्क्यूदरम्यान त्याने दोन वेळा सर्पमित्रांवर चावण्याचाही प्रयत्न केला. तरीही आपल्या अनुभव आणि धाडसाच्या जोरावर शुभम पराळे यांनी अखेर त्या विषारी नागाला सुरक्षितपणे पकडून विशेष भरणीत बंदिस्त केले.

यानंतर पकडलेल्या कोब्रा नागाला बुटीबोरी परिसरातील जंगलात नेऊन सुरक्षितपणे निसर्गात मुक्त करण्यात आले.

या यशस्वी रेस्क्यूमुळे घरातील कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून सर्पमित्र शुभम पराळे यांच्या धाडसी कार्याचे कौतुक केले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button