citynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशीममध्ये दुर्दैवी घटना; लॉजच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू

वाशीम शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. लॉजच्या छतावर गेलेल्या एका युवकाचा तोल जाऊन तो बाजूच्या छतावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील चार ते पाच जण कामानिमित्त वाशीम येथे आले होते. मुक्कामासाठी ते शिवाजी चौक परिसरातील एका लॉजमध्ये थांबले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास आशीष शेळके हा युवक लॉजच्या छतावर गेला.

मात्र काही कारणास्तव त्याचा तोल गेला आणि तो सुमारे २५ ते ३० फूट खाली असलेल्या शेजारच्या छतावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, युवकाचा तोल कशामुळे गेला आणि या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वाशीम शहर पोलीसांकडून सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृत युवकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button