Latest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPoliceramtek

रामटेकमध्ये पांधन रस्ता योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? भाजप नेत्यांचा गंभीर आरोप, प्रशासनात खळबळ

रामटेक | प्रतिनिधी

रामटेक तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेतील कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते तथा पांधन रस्ता योजना समितीचे सहअध्यक्ष उदयसिंह यादव यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.

उदयसिंह यादव यांनी दावा केला आहे की, यापूर्वी विविध योजनांतर्गत तयार करण्यात आलेले अनेक पांधन रस्ते सध्याच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेत नव्याने बांधल्याचे दाखविण्यात आले आहेत. जुन्या रस्त्यांना नव्याचे स्वरूप देत शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या कथित गैरव्यवहारामुळे सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा संशयही यादव यांनी व्यक्त केला आहे. गेल्या १२ ते १३ वर्षांत विविध योजनांमधून किती पांधन रस्ते बांधण्यात आले याची माहिती गोळा करून संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन तसेच संबंधित विभागांकडे लेखी तक्रार करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.

दरम्यान, या आरोपांमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास दोषींवर काय कारवाई होणार आणि शासनाच्या निधीचा नेमका वापर कसा झाला, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रामटेकमधील पांधन रस्ता योजनेवर करण्यात आलेले हे आरोप सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button