कर अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; वाशीममध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

वाशीम | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदेचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वाशीम नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन केले. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी नगरपरिषदेचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर मॉर्निंग वॉकदरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे राज्यभरातील नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याच पार्श्वभूमीवर वाशीम नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली तसेच हल्लेखोरांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कर्मचाऱ्यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अशा घटनांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, अहेरीतील या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटत असून आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



