अवैध रेती तस्करीवर एलसीबीचा प्रहार; 61.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती, दि. 6 जून – अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवैध रेती चोरी व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये रेतीसह ट्रक व डंपर असा एकूण 61 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दर्यापूर परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हेसांग टी-पॉईंट येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी विनापरवाना रेती वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे अडीच ब्रास रेती आढळून आली.
या प्रकरणात ट्रक चालक योगेश नामदेव आठवले (रा. दर्यापूर) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान ही रेती सुधाकर धुंदेकर याच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली. या कारवाईत ट्रकसह रेती असा एकूण अंदाजे 30 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विश्रोली धरण परिसरात रेतीने भरलेला डंपर पकडण्यात आला. चालक नितेश बाबूलाल गाडे याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले.
तपासादरम्यान डंपरचा मालक राजू उर्फ शेख नईम शेख करीम (रा. वरुड) असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत डंपरसह रेती असा अंदाजे 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण 61 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधातील मोहिम आगामी काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



